आमच्यासोबत सरकार स्थापनेपासून माघार घेत शरद पवार यांनी माझी विकेट घेतली नाही; तर त्यांच्या गुगलीने पुतणे अजित पवार यांचीच विकेट गेली, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शरद पवार यांनी सत्ता स्थापनेबाबत आमच्यासोबत बैठक झाली होती, हे तरी पवारांनी मान्य केले तेही कमी नाही; पण पवार बोलले ते पूर्ण सत्य नाही तर अर्धसत्य आहे.
त्यांच्या तोंडून लवकरच आपण पूर्णसत्य बाहेर काढू, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सत्ता स्थापनेसाठी अजित पवारांसोबत आपण पुढे गेलो. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेत डबलगेम केल्याचा दावा केला आहे.
त्यावर शरद पवार यांनी खुलासा करताना ही खेळी आपली गुगली होती आणि त्याने फडणवीस यांची विकेट गेल्याचा प्रतिदावा केला. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पहाटेच्या शपथविधीवेळेची गुपिते आता बाहेर येत असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, मी आधीपासून सांगत होतो की शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी आणि अजित पवार सरकार स्थापनेसाठी पुढे सरसावलो होतो. पवारांशी झालेल्या चर्चेनंतर आम्हा दोघांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते.
त्यानुसार आम्ही तयारी करत होतो. मात्र शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतली. पण पवार ही गोष्ट मान्य करत नव्हते. आज त्यांनी एकत्र सत्ता स्थापनेसंबंधी चर्चा झाल्याचे मान्य केले. त्यामुळे एक गुपित उघड झाले आहे.
रद पवार यांनी त्यांची माघार म्हणजे गुगली होती आणि त्यांनी माझी विकेट घेतल्याचे म्हटले आहे. पण माझी विकेट गेली नाही तर त्यांनी हा डबलगेम करून आपल्या पुतण्याचीच विकेट घेतली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
आपण पहाटेच्या शपथविधीवरील एक एक गुपिते बाहेर काढणार आहोत. आज पवारांच्या तोंडून सत्य काय ते बाहेर आले आहे. पण हे सत्य काही पूर्ण सत्य नाही. ते अर्धसत्य आहे. पण आपण लवकरच पवारांच्या तोंडून पूर्ण सत्यही बाहेर काढू, असे फडणवीस म्हणाले.