बंदी असतानाही पदपथावर अन्न तयार करून विक्री करणार्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने 1 हजार 21 गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.
यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असून, व्यावसायिकांसह गॅस वितरकावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
शहरातील पथारी व्यावसायिकांना महापालिकेने दिलेल्या परवान्यानुसार पथारीच्या ठिकाणी अन्नपदार्थ शिजविण्यास अथवा तयार करण्यास बंदी आहे.
तरीही अनेक पथारीधारक गॅस सिलिंडर वापरत आहेत. त्यामुळे पालिकेने या व्यावसायिकांकडून 1 हजार 21 गॅस सिलिंडर जप्त केले. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभाग, पोलिस विभाग, अन्नपुरवठा विभाग व गॅस वितरक कंपनीतील अधिकारी यांची एक बैठक झाली.
या बैठकीमध्ये आता गॅस सिलिंडर वापरणारे पथारीधारक, वितरकांवरही गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.