शहरातील मुंढवा, हडपसर भागात वाहन तसेच मोबाईल चोरणार्या दोघा अल्पवयीनांना मुंढवा पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या 5 दुचाकी व महागडे 6 मोबाईल जप्त करण्यात आले असून, मुंढवा, हडपसर पोलिस ठाण्यातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
शहर परिसरात मोबाईल, वाहनचोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांकडून हद्दीत गस्त वाढविण्यात आली असून, गुन्हे उघडकीस आणणे तसेच गुन्हे घडू नयेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मुंढवा पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर असताना मुंढवा रेल्वे ब्रीजखाली दोघे जण चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुंढवा, हडपसर भागातून मोबाईल, तसेच दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या पथकाने दोघांकडून सहा मोबाईल व चोरीच्या पाच दुचाकी असा 2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त आश्विनी राख, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे, अंमलदार दिनेश राणे, स्वप्नील रासकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.