पंढरपूर-महाड राज्य महामार्ग हद्दीतील वरंध घाटामध्ये अतिवृष्टीमुळे घाटात दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शनिवार, दि. 1 जुलैपासून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
त्यानुसार वाहनचालकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन महाड पोलिसांकडून करण्यात आले आहे. परंतु भोर प्रशासनाकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. त्यामुळे भोरमार्गे जाणार्या वाहनांची आता मोठी अडचण होणार आहे.
भोर-महाड मार्गावरील वरंध घाटात पावसाळा असल्याने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची शक्यता आहे. या कारणास्तव रायगड-अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा महामार्ग शनिवार, दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंद करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे.
तसेच याबाबतचे पत्र रायगड जिल्हा वाहतूक शाखा सहायक पोलिस निरीक्षक यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याला दिले आहे. त्यानुसार रायगड हद्दीतील हा महामार्ग पुढील 3 महिने अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
कोकणात जाणार्या वाहनचालकांची मोठी गैरसोय या महामार्ग अवजड वाहतुकी बंद होत असल्याने अवजड वाहने ही कोणत्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल, याबाबत पडताळणी करून महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून अभिप्राय जिल्हा वाहतूक शाखेकडून मागविण्यात आला आहे.
महाड एमआयडीसी पोलिसांकडून घाट बंद असल्याचा फलक महाडमधील राजेवाडी येथील भोर फाट्यावर लावण्यात आला आहे. परंतु भोर प्रशासनाकडून याबाबत काही हालचाली केल्या नसून, भोर मार्गावरून कोकणात जाणार्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार आहे.