सासवड येथे महावितरणच्या विरोधात आमदार संजय जगताप यांचे आमरण उपोषण

Photo of author

By Sandhya

आमदार संजय जगताप

पुरंदर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या अधिका-यांचा भ्रष्टाचार, अरेरावीचे धोरण, अकार्यक्षमता याच्या विरोधात सुरू केलेले आमरण उपोषण आणि जन आंदोलन हे सर्वसामान्य नागरीक आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीची सोडवणूक होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करीत पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी हा लढा समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे असे सांगत आमरण उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले.

आमदार संजय जगताप

सासवड येथील शिवतीर्थावर सोमवारी ( दि ३ ) आमदार संजय जगताप यांनी महावितरण कंपनीच्या अधिका-यांचा भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि भोंगळ कारभाराबाबत आमरण उपोषण आणि जन आंदोलन सुरू केले.

यावेळी पुरंदर – हवेलीतील अनेक गावे, विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी शिवतीर्थावर उपस्थित राहून आमदार संजय जगताप यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देत महावितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला.

नागरीक आणि शेतकऱ्यांकडून विविध कामांसाठी घेतलेले पैसे परत करा अन्यथा त्या पैशांची पावती द्या अशी मागणी यावेळी आमदार संजय जगताप यांनी केली.

यावेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी, उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांपुढे सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींचा पाढा वाचला.

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक बाबी माझ्याही निदर्शनास आल्या असून याबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आणि तोंडी सांगून त्यांच्या वर्तनात आणि कारभारात फरक पडला नाही.

शासनाची मंजूर असलेली ८६ रोहित्र सर्वसामान्य नागरीकांसाठी न बसविता ती व्यावसायिक आणि कारखानदारांच्या सोयीसाठी भ्रष्टाचार करून बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विजजोड, खांब, तारा, मिटर देण्यास नेहमीच दिरंगाई होत आहे. दोन – दोन वर्षे घरगुती आणि शेती पंपासाठी विजजोड मिळत नाही.

शेतीपंपाचे मिटर रीडिंग न घेता अंदाजे हजारो – लाखो रूपयांची वीजबील शेतकऱ्यांच्या माथी मारून ती भरण्यासाठी दबाव आणला जात आहे. या आणि यासारख्या अनेक अडचणी महावितरणकडून निर्माण करून ग्राहकांना मनस्ताप देण्यात येत असून महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा समाजातील सर्वच घटकांना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी, अधिका-यांचा मुजोरपणा आणि भ्रष्ट कारभार मोडीत काढून त्यांना वठणीवर आणण्यासाठी मला नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

Leave a Comment