PUNE : जिल्ह्यातील नऊ पैकी सहा आमदार अजित पवारांकडे तर २ शरद पवारांकडे

Photo of author

By Sandhya

 जिल्ह्यातील नऊ पैकी सहा आमदार अजित पवारांकडे तर २ शरद पवारांकडे

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार वगळता इतर नऊ आमदारांपैकी सहा जणांनी अजित पवार यांना, तर दोघांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला असून, एक आमदार तटस्थ असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झालेे.

खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते, मावळचे सुनील शेळके, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, पिंपरीचे अण्णा बनसोडे, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे हे आमदार अजित पवार यांच्या गटात गेले आहेत; तर आंबेगाव-शिरूरचे दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

जिल्ह्यातील शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार आणि शहरातील आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे, तर जुन्नरचे अतुल बेनके हे अद्याप तटस्थ आहेत.

अशोक पवार यांनी सकाळी मुंबई येथे ’सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली तसेच शरद पवार यांच्या मेळाव्यालाही त्यांनी हजेरी लावली.

अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर रविवारी ज्या निवेदनावर सह्या घेतल्या ते वाचले नव्हते, असे अशोक पवार यांनी या वेळी म्हटले आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके सुरुवातीला अजित पवार यांच्याबरोबर गेले असल्याचे कळले होते. परंतु, ते नंतर नॉट रिचेबल झाले असल्याने ते अद्याप तरी तटस्थ असल्याचे समजते.

खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते, मावळचे सुनील शेळके, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे हे अजित पवार यांच्या गटाने आयोजित केलेल्या मेळाव्याला व्यासपीठावर हजर होते. अजित पवार यांनी राजकीय जीवनात खूप साथ दिली असल्याने आपण त्यांच्याबरोबरच राहणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

Leave a Comment