पुण्यात राडा घालणार्‍या एम. एम. गँगच्या म्होरक्याला अटक; पोलिसांनी काढली धिंड

Photo of author

By Sandhya

पुण्यात राडा घालणार्‍या एम. एम. गँगच्या म्होरक्याला अटक; पोलिसांनी काढली धिंड

एकावर खुनी हल्ला करून तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या तसेच मोक्काच्या गुन्ह्यात फरार झालेल्या एम. एम. गँगच्या म्होरक्याला अखेर कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, त्याची कोंढवा परिसरातून धिंड काढण्यात आली.

मंगेश अनिल माने ऊर्फ मंग्या (वय 26, रा. सरगम चाळ, अप्पर बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 27 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास रोहित खंडाळे हा तरुण कोंढव्यातील साईनगर येथे फिरत होता.

त्या वेळी मंगेश माने, सागर जाधव, पवन राठोड, सुरज पाटील, अभिजित दुधणीकर यांनी त्याला अडविले. रोहित हा त्याचा मित्र वैभव साळवे याच्याबरोबर फिरत असल्याने त्यांनी शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली. मात्र, मंग्या फरार झाला होता. पेट्रोलिंग करीत असताना अंमलदार सुरज शुक्ला व सुजित मदने यांना मंग्या पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

दरम्यान, परिसरातील दहशत संपविण्याच्या दृष्टिकोनातून त्याची धिंड काढण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अंमलदार सतीश चव्हाण, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Comment