रोहीत पवार : भाजपने पवार कुटुंबात भांडणे लावली आहेत…

Photo of author

By Sandhya

भाजपने पवार कुटुंबात भांडणे लावली आहेत

भाजपने पवार कुटुंबात भांडणे लावली आहेत. मागील काही दिवस राष्ट्रवादीतील फुटीमुळे आम्ही भांडत बसलो आहोत आणि भाजप मस्तपणे एसीमध्ये बसून या सगळ्यांची मजा बघत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार अशी निवडणूक होणार नाही. अजित पवार कुटुंबीयांच्या बाबतीत तशी भूमिका घेणार नाहीत, असा विश्‍वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे येथे आमदार पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, भाजपने राजकारणात मागील काही दिवस झाले योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. भाजपने शिवसेना पक्ष फोडला. त्यामुळे भाजपविरोधात राज्यासह देशात वातावरण निर्माण झाले आहे. आता त्यांनी राष्ट्रवादीत देखील फूट पाडली. मी आजोबांबरोबर व पक्षाबरोबर राहण्याची आणि जनता कार्यकर्त्यांबरोबर राहण्याची भूमिका घेतली.

जेव्हा या घडामोडी घडत होत्या, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला एकच प्रश्‍न विचारला. जेव्हा आम्ही वयस्कर होऊ, 80 च्या पुढे जाऊ, तेव्हा तू अशीच भूमिका घेशील का? जर त्यांना हा प्रश्‍न पडला असेल, तर सामान्यांना हा प्रश्‍न नक्कीच पडला असणार, असे पवार यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. यावर आ. पवार यांनी खोत यांना मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. बारामतीमधील जनता हुशार… बारामतीमधून तुम्हाला पक्षाकडून उमेदवारी दिली तर तुम्ही लढणार का? असे विचारले असता पवार म्हणाले की, मला उमेदवारी दिली तरी मी निवडणूक लढणार नाही.

माझ्या कुटुंबातून कोणीही लढणार नाही. बारामतीमध्ये शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीने आणि अजित पवार यांनी केलेल्या कामामुळे त्यांनाच तिथे मतदान होईल. बारामतीमधील लोकसुद्धा नाराज आहे. पण जेव्हा प्रश्‍न विधानसभेचा येईल तेव्हा अजित पवारच विजयी होतील, असा विश्‍वास वाटतो.

Leave a Comment