PUNE : भारतीय जनता पक्षाचा शहराध्यक्ष कोण होणार ?

Photo of author

By Sandhya

PUNE : भारतीय जनता पक्षाचा शहराध्यक्ष कोण होणार ?

भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील संघटनात्मक निवडी येत्या दोन दिवसांत जाहीर होणार आहेत. त्यात पुणे शहर भाजपचा अध्यक्षही निश्चित झाला असल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बिडकर, योगेश टिळेकर यांची नावे आघाडीवर आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यानंतर पक्षातील सर्वच पदांवर नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी प्रदेशची कार्यकारिणीही जाहीर झाली.

त्यानंतर निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले. शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका मात्र रखडल्या आहेत.

मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळामुळे देशभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम सुरू असल्याने या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. आता मात्र येत्या आठवडाभरात ही निवडी जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

त्यानुसार पुणे शहर भाजपचा अध्यक्षही निश्चित झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी भाजपने काही निकष निश्चित केल्याचे समजते. त्यामध्ये प्रामुख्याने खासदार, आमदार पदावर असलेल्यांना, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या प्रमुख इच्छुकांना आणि विद्यमान अध्यक्ष यापैकी कोणाला अध्यक्षपदी निवड न करण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे पुणे शहर भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील अनेक इच्छुक या निकषात बाद होत असल्याने अध्यक्षपदासाठी घाटे, बिडकर यांच्यापैकी एकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

Leave a Comment