PUNE : पाण्याच्या गैरवापराची चौकशी करण्यात येणार

Photo of author

By Sandhya

PUNE : पाण्याच्या गैरवापराची चौकशी करण्यात येणार

वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रावर यापुढे केवळ महापालिकेचे टँकर भरले जाणार आहेत. ठेकेदारांच्या टँकरमध्ये पाणी भरण्यास या केंद्रावर मनाई करण्यात आली आहे. तसेच कपातीच्या काळात झालेल्या पाण्याच्या गैरवापराची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

‘टँकर केंद्रावरून पाण्याला फुटतात पाय!’ या शीर्षकाखाली दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी वडगाव शेरी टँकर केंद्रातील पाण्याच्या गैरवापराबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पावसकर यांनी बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेतली.

टँकर केंद्रावरून दिवसभरात किती टँकर भरले गेले, रजिस्टरला किती टँकरची नोंद आहे, केंद्रावरील पाण्याचे रीडिंग आणि जीपीआरएस यंत्रणेबाबत त्यांनी या वेळी माहिती घेतली.

पावसकर म्हणाले की, बुधवारी (दि. 12) रात्री ज्या वेळी टँकर केंद्र बंद केले त्या वेळचे रीडिंग आणि गुरुवारी सकाळी ज्या वेळी केंद्र सुरू केले त्या वेळचे रीडिंग सारखे आहे. बुधवारी सायंकाळी ठेकेदाराने भरून ठेवलेले टँकर गुरुवारी खाली झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच हे टँकर बांधकाम साईटवर गेल्याचेही जीपीआरएस यंत्रणेत दिसत आहे.

मात्र, हे पाणी बांधकामासाठी वापरले, की पिण्यासाठी वापरले, याची खात्री केली जाणार आहे. याबाबत संबंधितांना नोटीस देण्यात येणार आहे. कारण, बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई आहे. जीपीआरएस यंत्रणा कार्यान्वित असल्याशिवाय यापुढे कोणत्याही केंद्रावरून टँकरमध्ये पाणी भरले जाणार नाही.

सर्वच केंद्रांवर सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. जुन्या कर्मचार्‍यांची लवकरच बदली करण्यात येईल. याशिवाय केंद्रांवरील गैरव्यवहार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत

Leave a Comment