PUNE CRIME : चार लाख लुटण्यासाठी भर रस्त्यात व्यापार्‍यावर गोळीबार

Photo of author

By Sandhya

चार लाख लुटण्यासाठी भर रस्त्यात व्यापार्‍यावर गोळीबार

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंचसमोरील रस्त्यावर बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास करण्यात आलेला गोळीबार हा व्यापार्‍याला लुटण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. तलेश हसमुखलाल सुरतवाला (वय 51,रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे व्यापार्‍याचे नाव आहे.

पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गर्दीने गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी, सुरतवाला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलिसांनी मोटारसायकलवरील तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुरतवाला हे गोळीबारात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतवाला यांचे मंडईत तंबाखू आळीत चंदन टोबॅको नावाचे तंबाखू, सुपारी आणि सिगारेटचे किरकोळ आणि होलसेल विक्रीचे दुकान आहे. सकाळी साडेअकरा ते रात्री 9 वाजेपर्यंत ते दुकान चालवतात.

दिवसभर जमा झालेली रोकड घेऊन घरी जातात. नेहमीप्रमाणे बुधवारी सुरतवाला हे रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास दुकान बंद करून दिवसभर जमा झालेली चार लाखांची रोकड घेऊन दुचाकीवरून घराकडे निघाले होते. सोबत नोकर रमेश तौर देखील होता.

शिवाजी रोडने जेधे चौकात आल्यानंतर तेथून सिंहगड रोडने जात असताना, नऊ ते सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हॉटेल डायमंड आणि गणेश कला क्रिडा मंचच्यामध्ये अचानक दुचाकीवरून आलेल्या तिघांनी सुरतवाला यांच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी लावून त्यांना थांबविले. त्याच वेळी एकाने त्यांची पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा सुरतवाला यांनी त्याला विरोध केला. त्याने पिस्तूल काढून सुरतवाला यांच्या दिशने पायावर आणि पाठीवर अशा तीन गोळ्या झाडल्या. त्या वेळी नोकर तौर याने त्याच्याकडील टिफीन बॅग गोळी झाडणार्‍याच्या अंगावर फेकली.

त्याने परत तौरच्या दिशने गोळी झाडली. सुदैवाने ती त्याला लागली नाही. झटापटीत आरोपीने गाडीला अडकविलेली पैशाची बॅग घेऊन सारसबागेच्या दिशेने पळ काढला.

सुरतवाला यांच्या पायाला गोळी लागल्याने रस्त्यावर रक्ताचे मोठे डाग पडले होते. त्यानंतर ते रिक्षात बसून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.

पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी घटनास्थळी धाव घेत. झाडलेल्या गोळीच्या पुंगळ्या घटनास्थळी मिळाल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page