पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील छत्रपती चौकात एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी खोलवर मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने रस्ता खचला आहे, तसेच पाणीपुरवठा वाहिनी व स्ट्रॉर्म वॉटर वाहिनी तुटली. ही दुर्घटना गुरुवारी पहाटेच्या वेळेस घडली. सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही.
कुणाल आयकॉन रस्त्यावर प्लॅनेट मिलेनियम सोसायटीजवळ एका बांधकाम व्यावसायिकाचे व्यापारी व निवासी इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे महापालिका अधिकार्याने सांगितले.
इमारतीच्या तळघरासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. काळी माती असल्याने जमीन खचून सुरक्षेसाठी केलेले काँक्रीटीकरण पत्रे व फळ्यासह तुटले.
भूस्खलन झाल्याने आधार निघाल्याने रस्ता खचला. हा प्रकार पहाटेच्या वेळेस रस्त्याने वाकिंग करणार्या नागरिकांनी पाहिला. त्यांनी महापालिका, पोलिस व अग्निशमन विभागास कळविले. महापालिकेचे अग्निशमन विभाग, आपत्कालीन यंत्रणा व पोलिसांनी तातडीने घटनास्थळास भेट देऊन त्या भागात बॅरिकेड्स लावले.
जलवाहिनी तुटल्याने परिसरातील पाणीपुरवठा दिवसभर विस्कळीत झाल्याने रहिवाशांची गैरसोय झाली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा वाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले.