महामेट्रोचे पुण्यातील दुसर्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, मेट्रो या टप्प्याच्या उद्घाटनासाठी आता सज्ज झाली आहे. महामेट्रोने यापूर्वी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले होते.
आता दुसर्या टप्प्याचे उद्घाटनदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. कारण पुढच्या महिन्यात 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. त्या वेळी पंतप्रधान शहरातील विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार असल्याची चर्चा आहे. यात शहरातील पंतप्रधान आवास योजना आणि मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
मेट्रोचा पहिला टप्पा वनाज ते गरवारे कॉलेज आणि पीसीएमसी ते फुगेवाडीपर्यंतचे काम पूर्ण झाले. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात झाले.
आता पहिल्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो धावत असून, प्रवासीदेखील प्रवास करीत आहेत. आता मेट्रोचा दुसरा टप्पा असलेल्या गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर भुयारी मेट्रो स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.