देवेंद्र फडणवीस : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच…

Photo of author

By Sandhya

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते तयार नव्हते; मात्र त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. मीच दिल्लीतील नेत्यांचे मन वळविले.

माझ्या प्रयत्नामुळेच ते मुख्यमंत्री होऊ शकले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. एका मराठी चॅनेलवरील मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. ही मुलाखत फडणवीस यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

सत्तानाट्यातील गुपिते उघड या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सत्तानाट्यातील काही गुपिते उघड केली. महाविकास आघाडीचे सरकार बदलले पाहिजे, या सरकारमध्ये हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरतोय, असे अनेकांना वाटत होते.

याबाबत मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोललो होतो. एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलत असताना सरकारचे नेतृत्व त्यांच्याकडे असले पाहिजे. त्यांच्या लोकांना ते आत्मविश्वास देतील, असे मला वाटत होते. माझी ही भूमिका मी पक्षाला पटवून दिली.

त्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय दिल्लीत झाला. मी सरकारमध्ये राहणार नाही. फार तर प्रदेशाध्यक्ष होईन किंवा जी जबाबदारी द्याल ती घेईन. दोन वर्षे मेहनत करून भाजपला क्रमांक एकचा पक्ष करतो, असे नेत्यांना सांगितले होते आणि तसे ठरलेही होते, असे फडणवीस म्हणाले.

राज्यपालही आश्चर्यचकित एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत, हे मी चारच लोकांना सांगितले होते. राज्यपालांकडे जाईपर्यंत एकनाथ शिंदे आणि आमच्या तीन वरिष्ठांना ही गोष्ट माहीत होती. राज्यपालही पत्र वाचल्यानंतर आश्चर्यचकित झाले.

मी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे नाव जाहीर केले तेव्हा माझ्या चेहर्‍यावर चिंता नव्हती. माझा चेहरा विजयी होता. जिंकल्याचा आनंद होता. पण तो जास्त काळ टिकला नाही. राज्यपालांना भेटून घरी परतल्यानंतर वरिष्ठ नेत्यांचा मला फोन आला.

या नेत्यानी सांगितले ‘तुला उपमुख्यमंत्री व्हायचे आहे’. हा माझ्यासाठी धक्का होता. उपमुख्यमंत्री होणार याचे दु:ख नव्हते. पण, लोक काय म्हणतील याची चिंता होती. पण, नंतर पक्षाने घेतलेली भूमिका मला पटली. असा निर्णय घेण्यामागे काही ठोस कारणे होती. एक-दोन दिवसांतच लोकांचाही याबाबतचा संभ्रम दूर झाला, असे फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Comment