मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी,”मुख्यमंत्र्यांचं लोकेशन बघा. प्रत्येक दोन दिवसांनी ते दिल्ली जातात”, अशी टीका केली होती,
आता त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या पंतप्रधानांच्या भेटीवरून रविवारी नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांनी, “मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहेत.
अलिबाबा आणि गद्दार आहेत. त्यांचं नेहमी लोकेशन बघा. प्रत्येक दोन दिवसांनी ते दिल्लीला जातात.” अशी खोचक टीका केली होती.
याच टीकेला आता दादा भुसे यांनी,“प्रत्येकाने आपल्या वयाचं आणि अनुभवाचं भान ठेवलं पाहिजे. त्याप्रमाणे वागलं पाहिजे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. काही जणांचे अद्याप दुधाचे दात पडले नाहीत. त्यामुळे आपल्या मर्यादेत राहून कोणावर बोलतो, याचं भान ठेवलं पाहिजे.”असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर दादा भुसे यांनी, “या असल्या अफवांवर महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही. असं काहीही होणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गक्रमण करत आहोत. महाराष्ट्राचा विकास जलद गतीने होत आहे.” असे म्हटले.