राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकार महायुतीत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दिवशीपासूनच अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सातत्याने विविध नेते याबाबत वक्तव्य करत असल्याचे पाहायला मिळाले होते.
मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत भाष्य केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत,अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांसह माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री होतील असं विधान केलं होत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी तर अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याची तारीख देखील जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या.
महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरं कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. इतर कोणी त्याबाबत पतंग उडवू नये त्यांचे पतंग कटतील असा टोला देखील यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य करणाऱ्या विरोधकांना लगावला होता.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर आता काँग्रेस नेते आमदार कैलास गोरंट्याल यांनी एक विधान केलं असून, सध्या त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं आहे.
“आता पुन्हा एकदा अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील…’ असं ठाम मत कैलास गोरंट्याल व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे सुप्रीम कोर्ट पेक्षा मोठे आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
जर विधानसभा अध्यक्षांनी यांना अपात्र केलं नाही तर या 16 जणांना सुप्रीम कोर्टा अपात्र ठरवेल आणि एकनाथ शिंदे दहा ऑगस्टला पायउतार होतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील त्यांच्याच नेतृत्वामध्ये पुढच्या निवडणुका लढवल्या जातील. देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याला अर्थ नाही. मी जे सांगतोय ऐका राज्यांमध्ये परिवर्तन अटल आहे. असं ते यावेळी म्हणाले.