राज्यातल्या महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता… ; पाच महिन्यांमध्ये 19 हजार 533 बेपत्ता ?

Photo of author

By Sandhya

राज्यातल्या महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मंगळवारी सातवा दिवस होता. मागील काही दिवसांत राज्यातून पाच हजार महिला बेपत्ता झाल्या असल्याची माहिती समोर आली होती.

यावरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला होता. यावेळी ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. “राज्यातल्या महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

मंगळवारी याच मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रात जानेवारी 23 पासून ते मे 23 पर्यंत अशा पाच महिन्यांमध्ये 19 हजार 533 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती दिली.

“मागील काही दिवसांपूर्वी विधानसभेत मी यासंदर्भात माहिती दिली होती. त्यावेळी 6 हजार 510चा आकडा होता. परंतु आता नव्या आकड्यानुसार, महाराष्ट्रात पाच महिन्यांमध्ये 19 हजार 533 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.

याबाबत गृहविभागाने दखल घेऊन कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच सदनाला सुद्धा यासंदर्भातील माहिती देणे आवश्‍यक आहे,’ असे आमदार देशमुख म्हणाले.

राज्यात सरासरी 70 महिला दररोज बेपत्ता होत आहेत. तसेच, यावेळी फक्त मार्च महिन्यात 2200 महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर पुणे शहरात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचेही देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page