बरोबर एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्राच्या राजकारणात जसा भूकंप घडवून आणला होता अगदी तसेच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घडले आहे.
या पक्षाचे राज्यातील नंबर 1 चे नेते अजित पवार यांनीच पक्षाच्या भूमिकेच्या कथित विरोधात जात पुन्हा भाजपशी हातमिळवणी करून 2 जुलैला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी जे काही म्हटले आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे असे सांगतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्यासोबत आहे व पक्षाचे चिन्हही आपल्याकडे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्षपद, बहुतांश आमदार, पदाधिकारी आदी लोक आमच्यासोबत असून राष्ट्रवादी पक्ष आम्हाला देण्यात यावा अशी याचिका अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती.
या बंडानंतर शरद पवार गटानेही तातडीने हालचाली करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. दरम्यान, आता त्यावर म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नोटीस पाठविल्याचे समजते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.
पक्षाचे चिन्ह कोणाला? पक्ष आपला आहे आणि पक्षाचे चिन्हही आपले असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत निर्णय घेताना चिन्हाशी संबंधित 1968 च्या आदेशातील 15 व्या परिच्छेदाचा आधार घेतला जातो. सरळ शब्दांत सांगायचे झाले तर आता कोणत्या गटाच्या आमदारांची आणि खासदारांची संख्या जास्त आहे ते पाहून त्याच गटाला चिन्ह बहाल केले जाते.