मायलेकराचं भांडण सोडवायला गेलेल्या वृद्ध शेजार्याचा निर्घृण खून झाल्याची घटना वडूथ, ता. सातारा येथे रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. मध्यस्थी करणे जीवावर बेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
संशयिताला अटक केली आहे. पोपट गुलाब मदने (वय 64) असे मृत वृद्धाचे तर उमेश गुलाब राठोड (वय 29, रा. वडूथ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत पोपट मदने यांच्या शेजारी उमेश राठोड हा कुटुंबासह रहात आहे. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान उमेश त्याच्या आईबरोबर मोठमोठ्याने भांडत होता.
पोपट मदने हे त्यांना समजावण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी भांडण न करण्याबाबत सांगितले. ‘तू मोठ्या मोठ्याने ओरडू नकोस आमच्या घरात लहान मुले झोपली आहेत’, असेही मदने यांनी त्यांना सांगितले. मात्र, उमेश राठोड याचा राग अनावर झाला.
त्याने पोपट मदने यांच्या छातीवर चाकूने वार केले. हे वार पोपट यांच्या वर्मी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलीस उपनिरीक्षक फरांदे व त्यांच्या सहकार्यांनी संशयिताला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.