राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होणार असल्याची माहिती महायुतीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार आहे. यावेळी होणार्या विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे.
शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांच्या आमदारांना विस्तारात संधी मिळणार आहे. शिंदे गटातील भरत गोगावले, संजय शिरसाठ या आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे.
अजित पवारांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुसर्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपद मिळाले होते.
तर राष्ट्रवादीच्या एंट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षेवर पाणी फिरले. त्यातच आता लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, ज्यात शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना-भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचा मुख्यमंत्री झाला; पण नऊ मंत्र्यांनी म्हणावी तशी खाती देण्यात आली नव्हती, यावरून जाहीरपणे नाराजीही व्यक्त झाली होती.
गेल्या वर्षभरापासून सेनेच्या उर्वरित इच्छुकांना रोज मंत्रिपदाची शपथ घेतानाची स्वप्ने पडतात. भरत गोगावले, संजय शिरसाठ, संजय बांगर, बच्चू कडू असे कितीतरी आमदार हे आपण उद्याच मंत्री होणार, असे रोज माध्यमांना ठासून सांगत होते. त्यामुळे आता या महिन्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित झाले आहे.