केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा आहे. यानिमित्त ते काल संध्याकाळी पुण्यातील जे डब्यू मेरिएट हॉटेलवर दाखल झाले. त्यानंतर आज सकाळी ते थेट चिंचवडच्या मोरे प्रेक्षकगृहात हजेरी लावणार आहे.
आज बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुण्यातील पंचतारांकित हॉटेल ते पिंपरीतील रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह दरम्यान ताफ्याची रंगीत तालीमही काल पार पडली.
त्यांच्या या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आले आहे.
वाहतुकीतील बदल महावीर चौक – महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंक रोड -लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येतं आहे. पर्यायी मार्ग – वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्ह्यू चौक -अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील. हा सर्व बदल आज सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहेत.
दरम्यान, शाह यांच्या या दौऱ्यात युती सरकाराच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. त्यानंतर आता अमित शाह देखील दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.