आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून निवडणूक लढवावी, यासाठी भाजपची रणनिती असल्याची चर्चा आहे. त्यातच खुद्द मोदी यांच्यासाठी पुणे शहराची निवड करण्यात आल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर राजकीय वर्तुळात होती.
पुण्यातून लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, माजी खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ तसेच स्व. गिरीश बापट यांच्या कुटुंबातून मुलगा गौरव आणि सून स्वरदा बापट यांच्यासह काही इतर पदाधिकारीही इच्छूक आहेत.
मात्र, आता पंतप्रधानांचे नावच चर्चेत आल्याने या सर्वांचीच कोंडी झाली आहे. दरम्यान, या सर्व चर्चांनंतर पुण्यातून तयारी करणाऱ्या भाजपच्या इच्छुकांच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे.
मात्र, पक्षाचे नेतेच आपल्या मैदानात उतरणार असल्याने या सर्वांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागतच असल्याचे खासगीत सांगत या निर्णयाबाबत काहीच कल्पना नसल्याचा पवित्रा घेतला.
भाजपने आधीच “लोकसभा मिशन 2024′ जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीमधून अजित पवार गट भाजपने आपल्या बाजूने वळवला आहे.
तर, मोदींविरोधात एकत्र आलेल्या “इंडिया’ आघाडीलाही महाराष्ट्रातूनच दिशा दिली जात आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसेल, अशी चर्चा अनेक सर्वेक्षणातून समोर येत आहे.
हे पाहता पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातून लढावे, अशी भूमिका भाजपच्या रणनितीकारांनी मांडली आहे. पुण्यात भाजपला मागील दोन्ही निवडणुकांवेळी तब्बल तीन लाखांवर मताधिक्य मिळाले आहे.
तर देशातील वेगाने विकसित होणारे महानगर, ऐतिहासिक शहर आणि सुरक्षित मतदारसंघ असल्याने मोदींसाठी पुण्याची निवड केली जाण्याची शक्यता भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
..तर मोदींविरोधात लढण्यास मी तयार : धंगेकर सर्वाधिक चर्चेची ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते.
आता त्यांनी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पुण्यातून लढण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. “कॉंग्रेसने संधी दिल्यास आपण तयार असून लोकसभेलाही कसब्याची पुनरावृत्ती होईल,’ असा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.