जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. लाठीचार्जच्या निषेधार्थ आज भोकरदन तालुका बंदची हाक देण्यात आली होती.
या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने सुरू असताना स्वराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष विकास जाधव यांनी त्यांची नवी कोरी बाईक निषेध म्हणून व मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी बाईक जाळून निषेध नोंदवला.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला बसले होते. दरम्यान जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा असे जाहीर केले.
यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला. या नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अचानक पोलिसांकडून आंदोलकांवर आश्रू धुराच्या नळकांड्या फोडत अमानुष लाठीचार्ज करण्यात आला.
या प्रकाराने तमाम मराठा समाज संतप्त झाला. भोकरदन येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. बैठकीनंतर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज (रविवार) सकाळी दहा वाजता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलनाला पाठिंबा देऊन भोकरदन व शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली आहेत.