गणेशोत्सवाची सुटी एक दिवस अगोदर दिल्यामुळे विद्यार्थ्यांसह शाळांची अडचण झाली आहे. काही दिवसांपासून गणेशोत्सवाची सुटी सोमवारी की मंगळवारी याबाबत संभ्रम होता; मात्र शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाची सुटी सोमवारी जाहीर केली होती.
त्यानंतरही सुटीत बदल केला जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी सर्व मुख्याध्यापकांना संदेश पाठवून सोमवारी (ता. १८) शाळांना सुटी असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होणार असल्याने अनेक शाळांनी गणेशोत्सवादिवशी स्थानिक सुटी जाहीर केली आहे.
दरवर्षी ऋषीपंचमीदिवशी शाळांना स्थानिक सुटी देतात. बेळगाव शहर , तालुका आणि ग्रामीण भागात ऋषीपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे बुधवारी (ता. २०) शाळा सुरू राहिल्या तरी विद्यार्थी शाळेत येणार नाहीत.
त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुटीच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी केली होती; मात्र आपल्या हातात काही नाही, सरकार बदल करू शकते, असे सांगत चालढकल केली आहे.