भाजपचे आमदार अधिक असूनही सध्या राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. अशात शरद पवारांची साथ सोडून अजित पवार देखील सत्तेत सामील झाले आणि उपमुख्यमंत्री झाले.
राज्यात पुन्हा तीन पक्षांचे सरकार आल्याने प्रत्येक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पुढील मुख्यमंत्री आमचाच होणार असे म्हणत असताना आता शिंदे गटाच्या नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावे असे खळबळजनक विधान केले आहे.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ, नरहरी झिरवळ आणि धर्मरावबाबा यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असा सूतोवाच केला.तर दुसरीकडे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजप नेत्यांची इच्छा लपून राहिलेली नाही.
अशात आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावे असे विधान करत एकच खळबळ उडवून दिली.
“तीनही पक्षातील अनेक कार्यकर्ते आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बॅनर लावतात. परंतु एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करत आहेत म्हणून त्यांनी केंद्रात नेतृत्व करावे” अशी इच्छा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाट यांनी हे विधान केले. कॅपेसिटीचा जो भाग आहे तो फणवीस यांच्याकडे आहे. म्हणून आम्हालाही वाटत त्यांनी तेही नेतृत्व केलं पाहिजे असं शिरसाट यावेळी म्हणाले.
शिरसाट यांनी केलेल्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजप नेते आणि कार्यकर्ते शिरसाट यांच्या या विधानावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.