राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटल्यापासून शरद पवार पुन्हा एकदा आपला पक्ष जोमाने उभा करण्यासाठी बैठका, सभा घेत आहेत. बीड, येवला, कोल्हापूर यानंतर आता दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार पुण्यात सभा घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात शरद पवारांच्या या सभेने होणार आहे. तर या यात्रेची सांगता नागपुरातील शरद पवारांच्या सभेने होणार आहे.
दरम्यान पक्ष फूटीनंतर पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी सुरूवात झाली आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी भाजप-शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांना पाठिंबा दिला. त्यानंतर पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार राज्यभर दौरा, सभा, बैठका घेत आहेत.
दरम्यान दसऱ्याच्या दिवशी अनेक राजकीय नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येते,यापैकी प्रमुख सभा या उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे यांच्यासह या वर्षी शरद पवार देखील सभा घेतील. ते या सभेत काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.