मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दोन तास बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.
दरम्यान, राज्यात टोल दरवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे. टोलच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसेचं आंदोलन सुरू आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल(गुरुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
टोलच्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा केल्याची माहिती आहे. या चर्चेत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील टोलनाक्यांसंबंधित अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीमध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यातील टोलनाक्यांवरील शौचालय व अस्वच्छता याकडे राज ठाकरेंनी शिंदेंचं लक्ष वेधलं आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संबधित शासकिय अधिकाऱ्यांना या टोल नाक्यावरील शौचालयाची दुरूस्ती व स्वच्छता तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महिलांसाठी टोल नाक्यांवर स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
तसेच ठाणे व एरोली दरम्यान मधील टोल नाक्यांवर अवघ्या दीड किलोमीटरचं अंतर आहे. मग टोल का ? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला आहे.
तसेच टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी याबाबत संबधित टोल नाका कंत्राट घेतलेल्या कंपनींना नियोजन करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना शिंदेंनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
टोल नाक्याजवळ असलेली एका सोसायटी जी मुंबईत आहे मात्र त्यांना टोल देऊन सोसायटीत जावं लागतं त्या सोसायटीतील रहिवाशांसाठी टोल माफ करण्यात यावा याबाबतही शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच ठाण्यातील रहिवाशी हे दररोज कामानिमित्त मुंबईत प्रवास करतात यांना टोल माफी मिळावी हा विषय ठाकरेंनी मांडल्याचे कळते.
मात्र यावर नंतर आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.