
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.
खासदार शेवाळे यांच्या मानहानीप्रकरणी दोषमुक्तीचा केलेला अर्ज महादंडाधिकारी एस. बी. काळे यांनी आज सुनावणीदरम्यान फेटाळला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघांना आता मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वतीने वकिलांनी केलेल्या युक्तिवादात शेवाळेंनी केलेले आरोप मान्य नसल्याचे यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते.
त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी पुन्हा गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी ठाकरे आणि राऊत यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता.
त्यात त्यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा करून प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. आपल्याविरोधात कोणताही पुरावा नाही. केलेले आरोपही तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.
थोडक्यात, या प्रकरणी आपल्याला गोवण्यात आले असून, या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी मागणी ठाकरे आणि राऊत यांच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली.
शेवाळे यांच्यातर्फे या मागणीला विरोध करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
याप्रकरणी गुरुवारी निर्णय देताना महान्यायदंडाधिकारी एस. बी. काळे यांनी ठाकरे आणि राऊत यांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्यास नकार दिला. तसेच त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. याबाबत न्यायालयाचा तपशीलवार आदेश नंतर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.