
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ या आशायाचा जुना व्हिडीओ भाजपने सोशल मीडियावरून प्रसिद्ध केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राजकारणात पुन्हा कुठली उलथापालथ होणार का, या प्रश्नाभोवती फिरणाऱ्या चर्चांना उधाण आले. राजकीय वर्तुळात खळबळ उडण्यास सुरुवात झाल्यानंतर खबरदारी म्हणून हे ट्वीट डिलीट करण्यात आले. यावर आता पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी आहोत. जर एखाद्याला यायचे असेल तर व्हिडिओ टाकून येतो का? हा माझा पहिला प्रश्न आहे.”
“किती वेडेपणा, काहीतरी डोके ठिकाणावर असले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. १ दिवसही कमी नाही आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहोत.
एखादा व्हिडिओ पडला त्याचे अर्थ काढणे चुकीचे आहे,” असेही फडणवीस म्हणाले. तर या व्हिडिओबाबत एकनाथ शिंदे ‘मी भाजपने ट्वीट केलेला व्हिडीओ पाहिला नाही’, असे म्हणाले होते.
याप्रकरणी शिंदे यांनी सावध भूमिका घेतली. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील याप्रकरणी फडणवीस यांना टोला लगावला होता. संजय राऊत म्हणाले, “जर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू.
कारण ते किमान कायदेशीर मुख्यमंत्री असतील. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर ताशेरे उडलेले नाहीत. जर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि ते देवेंद्र फडणवीस असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू,” असे संजय राऊत म्हणाले.