आतापर्यंत आपण बनावट अधिकारी असल्याचे किंवा आमदार, खासदारांचा पीए असल्याचे भासवून लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार आपण ऐकले आहेत. पण आता बनावट सरकारी कार्यालयही उभं केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गुजरातच्या छोटा उदेपूर जिल्ह्यात बनावट सरकारी कार्यालये बांधून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली आहे. बनावट सरकारी कार्यालय उभं करून शासनाची सव्वाचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. चार कोटींहून अधिक अनुदान घेतले बनावट कार्यालय तयार करून अनुदान घेतल्याचा आरोपी संदीप राजपूत याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बोडेली यांच्या नावाने बनावट शासकीय कार्यालय तयार करून आदिवासी विभागाकडून अनुदानही घेण्यात आलं.
आश्चर्याची बाब म्हणजे या बनावट कार्यालयाला 93 विकासकामांच्या नावाखाली सव्वाचार कोटींहून अधिक चे अनुदान मिळावले . पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, आरोपी संदीपने 2021 ते 2023 या कालावधीत बनावट सरकारी कार्यालयातून बनावट कागदपत्रे तयार केली होती.
आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध 93 विकासकामांसाठी 4 कोटी 15 लाख रुपये मंजूर करून घेतले आणि मिळवले देखील. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे बनावट कार्यालय कसे उघडण्यात आले आणि त्यात कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचा सहभाग आहे का, हे तपासले जाणार आहे.
आरोपी संदीप याने पाटबंधारे विभाग म्हणून काम करणारे सरकारी कार्यालय सुरू केले होते. ते सिंचनाच्या कामांचे प्रस्ताव पाठवायचा आणि ते मंजूर देखील होत होते. कार्यालयावर संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला.