अकोला पश्चिमचे भाजपाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार शर्मा हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते.
कालरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवर्धन शर्मा यांच्या मृत्यूनंतर भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भावुक झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, शर्मा यांच्या निधनावर त्यांनी प्रतिक्रिया देत श्रद्धांजली वाहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्टमध्ये, “अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती.
त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला आहे. पक्षाची ही अपरिमित हानी आहे.” असे म्हटले आहे.
त्यासोबतच पुढे त्यांनी शर्मा यांच्या पक्ष कार्याची माहिती देत आपला सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त केली. त्यात त्यानु “अकोला जिल्ह्यात पक्षाचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशा विविध जबाबदार्या सांभाळत पक्षविस्तारात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले.
नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री आदी विविध जबाबदार्यांमधून त्यांनी जनतेची सेवा केली. विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार तर त्यांनी केलाच. पण, या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक क्षेत्रातही मोठे कार्य केले.
शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. अगदी अलीकडे मुंबईत त्यांना उपचारासाठी आणण्यात आले तेव्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. राममंदिराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग, अकोल्यातील रामनवमी शोभायात्रेची सुरुवात त्यांनी केली.
त्यांच्या निधनाने एक सच्चा रामभक्त आम्ही गमावला आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो,” असे म्हणत फडणवीसांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.