ज्या समितीचे प्रमुख जालन्यात जाऊन मनोज जरांगेंना सर सर म्हणतात त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. तसेच ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्यालाच आरक्षण मिळावे, त्याच्या नातेवाईकांना नको, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली.
यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भुजबळांच्या विधानावर शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
अशात भुजबळांच्या विधानावर आता सत्ताधारी गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी छगन भुजबळांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
बच्चू कडू म्हणाले,’‘मराठा समाजाला कुणबी म्हणून १०० टक्के आरक्षण मिळेल, दोन्ही पद्धतीने आरक्षण मिळायला सोपं जाईल. सर्वोच्च न्यायालयात सरकार ताकदीनं बाजू मांडेल आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतायत, त्यांनाही आरक्षण दिलं जाईल.
जे मराठा आहेत, ते कुणबी आहेत हे १०० टक्के सत्य आहे. ते पुढे म्हणाले,’मी कुणबी आहे. माझी जुनी नोंद कुणबी सापडली. मी मराठ्याचा कुणबी झालोच.
पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भातले मराठ्याचे कुणबी झाले. आता मराठवाड्यातले ५-६ जिल्ह्यातले मराठे कुणबी नाहीत हे म्हणणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. मराठे हे कुणबीच आहेत हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे’ असं म्हणत त्यांनी जहरी टीका केली आहे.
तत्पूर्वी भुजबळ म्हणाले होते की, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे, वातावरण शांत व्हावे यासाठी आमचे नेते त्यांच्याकडे जातात ते ठीक आहे. मंत्री जातात, न्यायमूर्ती जातात, तेही त्यांना हात जोडून सांगतात.
मला सांगा, आमचे मंत्री वगैरे ठीक आहे, पण न्यायमूर्ती, ज्यांच्या हातून ओबीसी कोण याचा निकाल लावण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आयोग नेमले जातात, तेच तिकडे गेले तर ओबीसींनी काय न्याय मिळणार आहे?
अशा लोकांकडून आम्हाला काय न्याय मिळणार जे तिकडे जावून हात जोडतात? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. असेही ते म्हणाले होते यावरून आज पत्रकार परिषदेत जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.