मी खासदारकीसाठी इच्छूक नाही. त्यामुळे माझा कोणीही कितीही अपप्रचार केला, तरी मी विधानसभा लढवणार आहे. तसे आमचे युतीचे ठरले आहे, अशी भूमिका शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज ( दि.११) सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
दरम्यान, जे कोणी अपप्रचार करीत आहे ते “इनोसंट” आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही, टीकाही करणार नाही, असे सांगून जो कोणी लोकसभा लढवेल, त्याला निवडून आणण्यासाठी माझे प्रयत्न राहतील, आणि ५० हजारांचे लीड मिळवून देईल, असेही केसरकर म्हणाले.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले की, आपण आगामी काळात विधानसभा लढवणार आहोत. कोणी खोटा प्रचार करत असेल तर त्यांना एवढेच सांगतो, मी खासदारकी नाही, तर विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे.
तूर्तास मी खासदारकीची कोणती इच्छा व्यक्त केलेली नाही. पुढच्या टर्मला खासदारकीबाबत विचार करता येईल, परंतु असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. जे माझ्यावर टीका करत आहेत, ते इनोसंट आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात काय बोलणार?
असा सवाल त्यांनी यावेळी केला. राज्याच्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात अनेक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य आगामी काळात एक नंबरवर असेल. पुढच्या काळात विद्यार्थाना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
लवकरच ‘माझी शाळा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यापुढे पोषण आहारामध्ये अंडी देण्यात येणार आहेत. तर मुलांमध्ये वाचन स्वच्छतेबाबतही आवड निर्माण होण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शाळांमध्ये किचन गार्डन हा प्रयोगही राबवला जाणार आहे. मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे.
मात्र, आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो, तर खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली. त्यामुळे आमच्याकडे ग्रामपंचायती नाहीत, असा अपप्रचार करणे चुकीचे आहे.
बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याच्या दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किणी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवृत शिक्षकांना तत्काळ मानधन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.