राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय. ही वर्णव्यवस्था वेगळी आहे, आधीची वेगळी होती. आता लायकी काढली जातेय. मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, कोणी कुठल्याही समाजाच्या विरोधात असू नये, असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त समता परिषदेने फुलेवाड्यात आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रीतेश गवळी, शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार रवींद्र धंगेकर आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, हक्कांसाठी लढण्याचा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे. परंतु, गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कांवर गदा आणू पहात असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही, आम्ही शांत बसणार नाही.
आम्हाला कोणाशीही भांडायचे नाही. भुजबळ म्हणाले, मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाचा मार्ग ज्या पद्धतीने मोकळा झाला, त्याच पद्धतीने महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आनंदाने मोकळा व्हावा. फुले स्मारकासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.