सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताबडतोब दिले जातील, आवश्यकता भासल्यास डीपीसीमधून फंड उपलब्ध केला जाईल,
अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. ८) विधानसभेत केली. याबाबत लक्षवेधी सूचनेत बोलताना आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, दुर्दैवाने रस्त्यावर वाढत असणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ठाणे येथे महानगरपालिकेच्या परवानगीने सेवाभावी संस्थेतर्फे सिग्नल शाळेचा अभिनव उपक्रम चालवला जातो.
सध्या हा उपक्रम कंटेनरमध्ये चालत असून या शाळांना स्नानगृहे, उपहारगृहे, वर्ग इत्यादीसंदर्भात अधिकची आर्थिक मदत अपेक्षित आहे. ठाणे महानगरपालिकेला अशी मदत करण्यास राज्य सरकार सांगणार का?
यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताबडतोब दिले जातील, असे स्पष्ट केले.
तरीही निधीची कमतरता भासल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तसेच जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले जातील, अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.