जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध विधाने करत आहेत. खासदार महोदयांनी तर राजीनामा देतो असे विधान केले आहे. या विविध विधानांमुळे, राजकीय दबावामुळे पाणी सोडले जात नाही असा समज झाला आहे.
सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचा समन्वय किंवा संवाद नाही असे दिसून आले आहे. कृष्णेत पाणी नसल्याने सिंचन योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे सरकारने लक्ष घालून पाणी सोडावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी कोयना धरणाच्या पाण्याचा मुद्दा नागपूर येथील सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला.
ते म्हणाले, कोयनेतून पाणी कमी आल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे ताकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे हक्काचे 32 टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे व कृष्णा नदी कोरडी न पडू देणे याची काळजी शासनाने घेतली पाहिजे.
दोन किंवा तीन टीएमसी पाण्यासाठी 32 टीएमसी पाण्यावर अन्याय करणे योग्य नाही. धरणात पाणीच नाही अशी परिस्थिती नाही. ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून या खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या भागात पाणी जाते. या काळात पाणी दिले तर उन्हाळ्यात त्रास होत नाही. पाणी सोडले तर या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही.
वीज निर्मितीचे पाणी दुष्काळी भागाला द्या ते म्हणाले, एप्रिल- मेमध्ये सांगली जिल्ह्यात पाण्याचा प्रचंड ताण येतो. याच काळात कोकणात वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले जाते. वीजनिर्मिती थोडीशी कमी करून पाणी जिल्ह्यात वळवण्यात यावे. त्यामुळे टंचाईचा सामना करावा लागणार नाही.