मराठा व धनगर या दोन समाजांचा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात फार गंभीर बनत चाललेला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे; तसेच धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यात यावा.
यासाठी संबंधित विभागाची लवकरात लवकर बैठक घ्यावी. तसेच यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी लोकसभेत केली.
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३३ टक्के समाज हा मराठा आहे. ज्या- ज्यावेळी देशाला गरज पडेल, त्या- त्यावेळी छातीचा कोट करून देशासाठी मराठा समाज पुढे आलेला आहे. देव, देश, धर्म या तिन्ही संस्थापनांसाठी मराठा समाज लढला आहे.
आजची परिस्थिती पाहिली तर २५ वर्षांपूर्वी ज्यांची २५ एकर जमीन होती, त्यांची आज दीड ते अडीच एकर जमीन राहिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मुलांना आर्थिक आणीबाणीला सामोरे जावे लागत आहे.
गरिबीमुळे दीनदुबळ्या अवस्थेत हा समाज चालला आहे. मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी खासदार निंबाळकरांनी केली आहे.
धनगर आणि धनगड या दोन शब्दांचा विपर्यास झाला आहे. महाराष्ट्रात धनगड नावाची कुठलीही जात नाही. महाराष्ट्र सरकारने याबाबत स्पष्ट माहिती दिलेली आहे. महाराष्ट्राबाहेर धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण आहे.
मात्र, महाराष्ट्रात या समाजाला एसटीमधून आरक्षण मिळत नाही. संबंधित विभागाची संयुक्त बैठक लवकर घ्यावी व मराठा व धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी खासदार निंबाळकरांनी लोकसभेत केली.
शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठा समाज जास्त मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा आता मराठा समाजातील लोकांकडे पैसे राहिलेले नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी उद्या भविष्यात किडन्या विकायच्या की काय, अशी परिस्थिती पालकांची झालेली आहे. महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, त्यातल्या सर्वात मराठा समाजातील लोकांच्या झाल्या आहेत, असेही खासदार निंबाळकर म्हणाले.