टाऊनशिप कायद्यानुसार उभारण्यात आलेल्या नांदेड सिटीतील मिळकतींना महापालिकेच्या कर मूल्यांकनावर ६६ टक्के सवलत देऊन ३४ टक्के मिळकतकर आकारण्यात आला आहे.
मात्र, हा कर आकारताना त्यांना शासनाने कायम ठेवलेली ४० टक्के निवासी करसवलत देण्यात आलेली नाही. ही बाब समोर आल्यानंतर आता महापालिकेकडून नांदेड सिटीतील निवासी मिळकतींना पीटी-३ अर्ज भरून जागेवरच ही ४० टक्के सवलत दिली जाणार आहे.
नांदेड सिटीतील मिळकतींना करसवलत देण्यासाठी दि. २३ आणि २४ डिसेंबर तसेच दि. ३० डिसेंबर व ३१ डिसेंबर या दिवशी महापालिकेकडून विशेष शिबिर आयोजित करण्यात आली आहेत.
नांदेड ग्रामपंचायत कार्यालयात हे शिबिर होणार असून सकाळी दहा ते सायंकाळी ६ या वेळेत पीटी-३ अर्जांसह महापालिकेने मागणी केलेली कोणतीही दोन कागदपत्रे दिल्यानंतर तत्काळ बिलांमध्ये दुरूस्ती केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली. तसेच, या शिबिरांसाठी स्वतंत्र कर्मचारीही नियुक्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.
कुठे मिळेल अर्ज ? पीटी-३ अर्ज propertytax.punecorporation.org या वेबसाइट वरून नागरिकांना डाऊनलोड करून घेता येणार आहे. या शिवाय, महापालिकेकडून नांदेड सिटीमधील सोसायट्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर हे अर्ज पाठवण्यात येणार आहेत. या अर्जाची प्रतही नागरिकांना घेऊन येता येणार आहे.
यापैकी कोणतीही दोन कागदपत्रे आवश्यक नागरिकांना पीटी-३ अर्ज सादर करताना महापालिकेने निश्चित करून दिलेल्या कागदपत्रांमधील कोणतीही दोन कागदपत्रे सादर करावी करावी लागणार आहेत. त्यात मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, गॅस कनेक्शन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र यापैकी कोणतेही दोन कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.