दारुड्या पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नी, सहा वर्षीय मुलगी व मुलाची बॅटने मारहाण करून हत्या केल्याची घटना गुरुवारी ठाण्यातील कासारवडवली येथे घडली. या घटने प्रकरणी पोलिसांनी तिहेरी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.
अमित धर्मवीर बागडी (29, राहणार-इसार, हरियाणा) असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळ हरियाणा राज्ययील राहणारा असून त्याची पत्नी भावना बागडी (24) ही गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या पासून विभक्त होऊन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिच्या दिराकडे ठाण्यातील कासारवडवली गावात राहत होती.
दरम्यान, आरोपी अमित आपल्या सख्या लहान भावाकडे राहत असलेल्या पत्नी व मुलांना भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी ठाण्यात आला होता. गुरुवारी सकाळी आरोपीताचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी गेला.
त्यानंतर साधारण साडे अकरा वाजेच्या सुमारास तो घरी परतला तेव्हा त्याला घरात भावना तसेच दोन मुले हे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिहेरी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे यांनी दिली.