मनोज जरांगे पाटील : “जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार”

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्यासंदर्भात आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे.  तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काय फायदा झाला अशा विचारणा करणाऱ्या पोस्ट व्हायरल होताना दिसून येत आहेत.

याच मुद्द्यावरून आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपण बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावरून मरोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे काय फायदा झाला? असा प्रश्न काही युजर्सकडून विचारण्यात येत आहे. त्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

याविषयी बोलताना सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

“महाराष्ट्रातील काही १०-२० जणं सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सलग बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं असं ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाहीये. हा लढा मराठा समाजासाठी आहे.

सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलतायत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. पुढे बोलताना त्यांनी “मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत.

माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाहीत तोपर्यंत मी बाजूला हटत नाही. श्रेयासाठी हे विनाकारण मध्ये घुसायला लागले आहेत. मराठा समाजाचेही काही जळणारे नेते आहेत”,  असे म्हणत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली.

त्यासोबतच “हे ठरलेले १५-२० जण आहेत. मराठ्यांच्या जिवावर खाणारे आहेत ते. गरीब घरातला मुलगा मराठ्यांसाठी लढतोय ही यांची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. हा मॅनेजही होत नाही, फुटतही नाही आपलं काय होणार? असा प्रश्न त्यांना पडलाय.

मी १० तारखेला या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषण करणार आहे”, असे जरांगे पाटील म्हणाले. पुढे मनोज जरांगे यांनी,”जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी जाहीर केलं.

मी कुठेही बसलो, तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतीत दुसरं काही करायचं असतं, तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो. लोकांमध्ये कशाला आलो असतो?” असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page