राज्य सरकारने पुरंदर तालुका अतितीव्र दुष्काळी म्हणून जाहीर केला असला तरी पिण्याच्या पाण्याचे चार टँकर देण्यापलिकडे शासनाने मदत केली नाही. वास्तविक पुरंदर तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अटल भूजल, पालखी महामार्ग व इतर रस्ते, पाणी योजना, जलजीवन योजनेची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याने आणि दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत गांभीर्य नसलेल्या शासनाच्या निषेधार्थ सोमवारी ( दि १९ फेब्रुवारी ) पुरंदर महाविकास आघाडीतर्फे सासवड येथे पालखी महामार्गावर रास्ता रोको करून तिव्र जनआंदोलन करणार असल्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केले.
रविवारी दि १८ फेब्रुवारीला सासवड येथे खासदार शरद पवार यांची जाहीर सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी ( दि १२ ) सासवड येथे महाविकास आघाडीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ संजय जगताप यांनी राज्य शासनाच्या नाकर्तेपणावर टिका केली.
याप्रसंगी माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे, महाविकास आघाडीचे प्रवक्ते नंदकुमार जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अभिजीत जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, गणेश जगताप, चेतन महाजन, पुष्कराज जाधव तसेच सुधाकर टेकवडे, विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाणे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीबाबत यापुर्वी तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाचवेळा बैठका घेऊन राबविण्याच्या उपाययोजनांबाबत शासनाकडे प्रस्ताव दिले.
चा-याबाबत एनजीओं च्या माध्यमातून प्रयत्न करीत असून ठिकठिकाणी चारा वाटपही केला आहे. सध्या तालुक्यात ७० हुन अधिक पाण्याच्या टँकरची आवश्यकता मात्र शासनाकडून याबाबत कोणत्याही सुचना अथवा मदत मिळाली नाही. रस्ते, पाणी योजनांची कामे निकृष्ट दर्जाची सुरू असून ठेकेदार मंत्री आणि नेत्यांच्या सोईरीकेत आल्याने तालुक्यात अराजकता माजली आहे.
वीर धरण वगळता पाण्याचे बहुतेक स्तोत्र आटले असून तालुक्याचे महत्त्वाचे अधिकारी ईव्हीएम मशीनच्या सीपीयूच्या चोरी प्रकरणात निलंबित असून २००३-०४ प्रमाणे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आले. त्यामुळे झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी तिव्र जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे आ संजय जगताप यांनी सांगितले.
पुरंदर मध्ये ३२ हजार बोगस मतदार असल्याच्या आरोपाबाबत बोलताना आ संजय जगताप यांनी, याबाबत उच्च न्यायालयाने शासन आणि निवडणूक आयोगाला बोलावून चौकशी केली असता १२२ नावांत साधर्म्य आणि २९७ नावे दुबार असल्याची माहिती समोर आली. याव्यतिरिक्त यामध्ये काहीही मिळाले नाही.
असे सांगत आ जगताप यांनी, ईव्हीएम मधील सीपीयू चोरीबाबत ज्याप्रमाणे शासनाने तत्परता दाखविली त्यापणे दुष्काळ निवारणाबाबत शासनाने तत्परता दाखवावी असा उपरोधिक टोलाही आ संजय जगताप यांनी यावेळी लगावला.
जलयुक्तच्या भ्रष्टाचाराची चौकशी नाही
जलयुक्त शिवार २ योजना आली तरी पुरंदरच्या गाजलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी समितीकडून अद्यापही माहिती मिळत नाही., चौकशी होत नाही याबाबतही आ जगताप यांनी खंत व्यक्त केली.
तर ही वेळ आली नसती
१५ आॅगस्टला पुरंदर च्या नवीन प्रशासकीय इमारतीत तहसील व इतर तहसील कार्यालय स्थलांतरित करून कामकाज सुरू करणार होतो. पालकमंत्र्यांनीही प्रशासनाला तशा सुचना केल्या होत्या. मात्र काहींनी यात आडकाठी घातल्याने तहसील कार्यालय नवीन इमारतीत आले नाही.
त्यावेळी जर कार्यालयाचे स्थलांतर नवीन इमारतीत झाले असते तर आज ईव्हीएम चोरी व प्रमुख अधिकारी निलंबित होण्याची वेळच आली नसती असे माणिकराव झेंडे व सुदामराव इंगळे यांनी सांगितले.