
राज्यात सध्या गुन्हेगारीच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आली, अशातच येरवडा कारागृहातील कैद्यांनी अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे.
पठाण असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
कारागृह आधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातून मारहाण, गोळीबार हत्या या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत.
ही घटना आज सकाळी येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये घडली. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघे ही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनी आज किरकोळ कारणावरून १० इतर गुंडाना घेऊन शेरखान पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली.
या घटनेत पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली तर उजवा हाथ फ्रॅक्चर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मारहाण करणाऱ्या कैद्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या त्याच्या घरासमोर हत्या झाली. त्याचा तपास अजून सुरूच आहे. अशातच आता गुन्हेगारांने आधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.