पुरंदर तालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने सध्या बहुतांश गावांत नागरीकांच्या पिण्याच्या तसेच जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. १५ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक राहील्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
टंचाईबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत मात्र शासनाकडून अद्यापही कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचे १५ दिवसांचे नियोजन केले असून हे पाणी जास्तीत जास्त भागापर्यंत पोहोचविणे तसेच
नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचे तसेच जनावरांच्या चारा पाण्याच्या नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगत खासगी विहिरी अधिग्रहण करून या परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
गुरूवारी ( दि २२ ) सासवड येथील पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या महसूल, कृषी, पंचायत समिती, जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, पाटबंधारे, वन आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आणि पत्रकार परिषद आ संजय जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ अमिता पवार – गावडे, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आ जगताप यांनी, तालुक्यातील पाझर तलावांतील पाण्याची परीस्थिती, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, जलजीवन योजना, सासवड व जेजुरी पाणी पुरवठा योजना, जेजुरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.
पुरंदर उपसा योजनेचे दोन्ही पंप सुरू करण्यात आले असून १५ दिवसांच्या पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये योजनेच्या माळशिरस वितरिकेतून दि २२ ते २६ फेब्रुवारी पर्यंत आंबळे स्कोअरवाॅल मधून आंबळे आणि पिसर्वे भागाला पाणी सोडण्यात येणार आहे. दि २६ ते २८ फेब्रुवारी पर्यंत माळशिरस स्कोअरवाॅल मधून माळशिरस परीसर.
दि १ ते ४ मार्च पर्यंत सबमेन १, मायनर ८ आणि सबमेन २ मायनर ६ मधून पांडेश्वर, माळशिरस, टेकडी आणि नायगाव. दि ५ ते ९ मार्च पर्यंत सबमेन १, सबमेन २ आणि पोंढे नवीन लाईन मधून पोंढे, नायगाव, माळशिरस आणि टेकवडी. दि १० ते १५ मार्च पर्यंत सबमेन ३ नवीन पोंढे लाईन, सबमेन १ आणि सबमेन २ मधून पोंढे, राजुरी, नायगाव, माळशिरस आणि पांडेश्वर परीसरात पाणी देण्यात येणार आहे.
तर योजनेच्या दिवे वितरीकेतून दि २२ ते २४ फेब्रुवारी पर्यंत वनपुरी स्कोअरवाॅल, मायनर ३, मायनर २ मधून वनपुरी, पारगाव, सिंगापूर आणि कुंभारवळण. दि २५ ते २८ फेब्रुवारी पर्यंत नेदबाई स्कोअरवाॅल आणि मायनर ४ मधून उदाचीवाडी आणि पारगाव. दि १ ते ३ मार्च पर्यंत लवांडे स्कोअरवाॅल आणि लेंडी स्कोअरवाॅल मधून सिंगापूर.
दि ४ ते ६ मार्च पर्यंत माणकेश्वर स्कोअरवाॅल आणि इनामदार स्कोअरवाॅल मधून वाघापूर. दि ७ ते १२ मार्च पर्यंत गु-होळी स्कोअरवाॅल आणि मायनर ५ मधून गु-होळी आणि कुंभारवळण आणि दि १२ ते १५ मार्च पर्यंत दिवे पंप हाऊस क्रं ६, सोनोरी, माळवदकर स्कोअरवाॅल, चुनाखाण मायनर व सोनोरी स्कोअरवाॅल मधून दिवे, सोनोरी, काळेवाडी, झेंडेवाडी, ढुमेवाडी आणि पवारवाडी परीसरात पाणी देण्यात येणार आहे.
सध्या पुरंदरमध्ये १९ ग्रामपंचायतींना २५ टँकरने १०६ खेपांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आणखी ८ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आले असून ते मंजुरीसाठी पाठवले आहेत.
विहीरी अधिग्रहित करीत असून विहीर मालकाला दररोज सहाशे रूपये देण्यात येणार आहेत. जेजुरी एमआयडीसी पाणी योजनेतून टँकर भरून देण्यासाठी दररोज सहाशे क्यूबीक मिटर पाण्याची मागणी केली आहे.
चा-याच्या ४ हजार किलो बियाण्याची उपवब्धता केली आहे. शासनाकडे कृषी विभागाच्या महसुल मंडल निहाय चारा डेपोची मागणी केली आहे. याबरोबरच चा-यासाठी सेवाभावी संस्थांना आवाहन केले असून अनेक व्यक्तींनी रोख रक्कम, धनादेश दिले असून याव्दारे चा-याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आ संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुरंदर उपसा योजनेचे पाणी सुरू असताना मागील बाजूचे शेतकरी अनाधिकृत व्हाॅल्वव्दारे पाणी चोरी करीत असून कारवाई करण्यास अधिकारी दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी याप्रसंगी करून अशांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना आमदार संजय जगताप यांनी, पाणीचोरी करणा-यांवर कारवाई करण्यातबाबत सुचना करणार असल्याचे सांगितले.