
जेवण वाढताना झालेल्या किरकोळ वादातून महिलेने पतीवर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी महिलेविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश ससाणे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कामावरून जेवण करण्यासाठी घरी आले. त्यावेळी पत्नी जयाने त्यांच्याकडे पाचशे रुपये मागितले.
परंतु पैसे न दिल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी पत्नीने जेवण वाढताना ताट आणि तांब्या जोरात आपटला. त्यावर रमेश यांनी पत्नीला चापट मारली. त्याचा राग आल्याने जयाने पती रमेश यांच्या दंडावर आणि पाठीवर चाकूने वार केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात दाखल केले आहे.