अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : ओबीसी-मुस्लिम राजकीय समझोता गरजेचा…

Photo of author

By Sandhya

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

देशातील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान संपविण्याचा अजेंडा राबवत आहेत. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये, तसेच ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी ओबीसी आणि मुस्लिमांमध्ये राजकीय समझोता आवश्यक आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीची एसएसपीएमएस मैदानावर ‘सत्ता परिवर्तन सभा’ मंगळवारी आयोजित केली होती, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी, ओबीसी नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंढे, प्रियदर्शनी तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा येणार नाही, याची दक्षता मतदारांनी घेतली पाहिजे.

त्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक मतदाराने आपल्याबरोबर इतर पाच मतदार जोडले पाहिजेत. ज्या दिवशी पाच मतदार आपण जोडू शकलो त्या दिवशी भाजपचे सरकार केंद्रात येणार नाही. यासाठी साम- दाम या क्लृप्त्या वापरून आपल्याला हे करावे लागेल. लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असून, त्याआधी अनेक घडामोडी घडतील, दंगली होतील.

नेत्यांना फोडण्याचे काम तर सुरूच आहे. अशावेळी मतदारांनी जागरूक राहण्याची गरज आहे. प्रकाश शेंडगे म्हणाले, 75 वर्षे ज्यांच्याकडे सत्ता सोपवली त्यांनी सत्तेचा मलिदा लाटला.

आमच्याकडे ऊसतोडी, हमाली, वेठबिगारी दिली. ओबीसी आरक्षणाचे तीनतेरा होताना महाराष्ट्राने बघितले आहे. शासनाने बोगस कुणबी प्रमाणपत्रे दिली. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्याची मागणी आम्ही बाळासाहेब आंबेडकर तुमच्याकडे करत आहोत. प्रा. मुंढे म्हणाले, राज्यातील शेतकरी, विद्यार्थी हवालदिल झाला आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही, अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page