पालकमंत्री दादा भुसे : दुष्काळग्रस्तांना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना  243 कोटींची मदत

Photo of author

By Sandhya

पालकमंत्री दादा भुसे

जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे गेल्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी २४३ कोटी रुपये जाहीर झाले आहेत. मालेगाव, येवला व सिन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांत निर्माण झालेली भीषण परिस्थिती लक्षात घेता खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

त्यांना मदतीसाठी राज्य सरकारने दोन हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजारांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. शासन निर्णय गुरुवारी (ता. २९) निर्गमित करण्यात आला. त्याचा जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांना लाभ होणार आहे.

मालेगाव तालुक्याला १०८ कोटी ९२ लाख ३३ हजार, तर सिन्नर तालुक्यासाठी ७५ कोटी ८१ लाख, येवला तालुक्यासाठी ६३ कोटी ३३ लाख इतका निधी वितरित केला आहे. दरम्यान, उर्वरित तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही आता मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

मालेगाव तालुक्यातील १० लाख १९ हजार १२ शेतकऱ्यांना या दुष्काळ निधीचा लाभ मिळणार आहे. त्यात दोन हेक्टरच्या आतील एक लाख सहा हजार ७९५ इतक्या क्षेत्रावर, तर दोन ते तीन हेक्टरच्या सहा हजार ५६६ क्षेत्रावर दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे.

शासन निर्णयानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

”या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याचा यात विचार केला. शेतकऱ्यांप्रती राज्य सरकार समर्पित असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.”- दादा भुसे, पालकमंत्री

Leave a Comment