शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील : कार्यकर्त्यांत विसंवाद नाही

Photo of author

By Sandhya

शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

कुटुंब विभक्त झाले असले, तरी लग्नात ते एकत्र येतात आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडते. अनेकदा अशा कार्यात मनेही जुळतात. त्यामुळे महायुतीतील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करावयाचे आहे, हा निश्चय केला आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद नाहीत, असे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला बगल देत त्यांनी लग्नकार्याचे उदाहरण देत हे उत्तर दिले.

पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील युतीतील सर्व पक्षांच्या पदाधिकार्‍यांची बैठक सोमवारी पुण्यातील भाजप कार्यालयात झाली. या बैठकीनंतर पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.

बैठकीला शिवसेनेचे (शिंदे गट) संजय माशेलकर, नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, रूपाली चाकणकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सर्व पक्षांच्या एकत्रित बैठका विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर घेण्यात येणार आहेत. बूथपातळीपर्यंतचे कार्यकर्ते एकत्र केले जातील. प्रत्येक बूथवर गेल्या वेळेपेक्षा अधिक 370 मते मिळविण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करतील. विविध पक्ष, कार्यकर्ते एकत्र येत असल्याने, काही ठिकाणी थोडे मतभेद असू शकतात.

मात्र, तिन्ही पक्षांचे तीन ज्येष्ठ या तक्रारी सोडवितात. त्यामुळे कोठेही वाद नाहीत. विधानसभा निवडणुकीबाबत सध्या चर्चा होत नसून, लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 जागा जिंकण्यासाठी आम्ही जोरात तयारी करत आहोत.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय मी जवळून पाहिला आहे. कुणबी नोंदी केल्या. सगेसोयरेंबाबत पित्याकडून आढळलेल्या नोंदी ग्राह्य धरण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले.

त्यासंदर्भात साडेसहा लाख हरकती आल्या आहेत. त्यांची सुनावणी झाल्यानंतर, कायद्यात सुधारणा केली जाईल. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण दिले.

नोटीफिकेशन वाचल्यानंतरच जरांगे हे वाशीमधून परत गेले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारही टिकविता आले नाही. सरकार कधी गेले ते त्यांना कळाले नाही, ते काय मोदी-शहा यांचा सामना करणार, असे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 

Leave a Comment