महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीत येण्याचे निमंत्रण आहे. परंतु त्यांचा स्वतंत्र उमेदवार पाठीमागे घेऊन मला बाहेरून पाठिंबा दिल्यास तो स्वीकारू, असे सुचक विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. कुरुंदवाड येथे ‘दै. पुढारी’शी त्यांनी आज (दि.२५) संवाद साधला.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळातच शक्तीपीठ महामार्ग आणि एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा विधिमंडळात निर्णय झाला आहे. शक्तीपीठात शेतकऱ्यांची जमीन जाणार असल्याने आणि तीन तुकड्यांमुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. याच्या निषेधार्थ अडीच वर्षांपूर्वीच महाआघाडी सोडली आहे.
ते प्रश्न सुटलेले नाहीत म्हणून त्या आघाडीत कसे जाणार ? असा सवाल करून भारतीय जनता पार्टीने ही निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांची संगत २०१५ सालीच सोडलेली आहे. त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना हा स्वतंत्र पक्ष रजिस्टर आहे.
संघटनेच्या पुढाकारातून हा पक्ष स्थापन झाला आहे. या पक्षाच्या माध्यमातून आज पर्यंतच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत. या निवडणुकीतही स्वाभिमानी पक्षामार्फतच निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे कोणत्याच आघाडीत सहभागी झालेलो नाही.
एखाद्या आघाडीने त्यांचा स्वतंत्र उमेदवार पाठीमागे घेऊन बाहेरून पाठिंबा दिल्यास आमची कोणतीही हरकत नाही, आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. चळवळीत असताना कोणत्याही पक्षात गेलेलो नाही.
चळवळ टिकवण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. समोर उमेदवार कोण आहे. यापेक्षा मी निवडून येणार आहे. पण विरोधकाला कमजोर समजत नाही, असेही ते म्हणाले.