सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली लोकसभेची जागा आम्ही सोडली नसून ती आमचीच असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिवसेनेचा उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपासून सांगली दौऱ्यावर आहेत.
शिवसेनेच्या उमेदवाराला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. त्याच्यात कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करत आहे का? प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपला कोणी मदत करू इच्छिते का? याबाबत शंका असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
महाविकासआघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सांगलीत आलो आहे. भाजपच्या खासदाराविरूद्ध येथे नाराजी आहे. सांगलीतील प्रमुख राजकीय नेत्यांना लढत एकास एक व्हावी, असे वाटत आहे.
त्यानंतर काय चमत्कार होतो तो पहावा लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. भिवंडीमध्ये शरद पवार यांचीच राष्ट्रवादी जिंकू शकते, तसेच ठाणे आणि कल्याणमध्ये ठाकरे शिवसेनेचाच उमेदवार जिंकणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.