महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत आज (९ एप्रिल) सायंकाळी गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे.
मात्र, यासंदर्भात राज ठाकरे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे मनसेच्या महायुतीतील सहभागासंदर्भातील राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्याच्या माध्यमातून भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
या मेळाव्याच्या आधी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले? “राज ठाकरे हा वाघ माणूस आहे. पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत, असे ते सांगत होते. आता त्यांनाच दिल्लीची वारी करुन यावे लागतेय.
यात कुठेतरी राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम होते आहे का? त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम होतेय का? अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेला येत आहे. राज ठाकरे आज जी भूमिका मांडतील ती कदाचित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नसेल, असा कयास सर्वांचा आहे.
राज ठाकरे दिल्लीच्या पुढे कधी झुकणार नाहीत, ही मराठी माणसांची अपेक्षा आहे. त्यामुळे ते आज जे बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असेल, असे मला वाटते”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल असल्याचे बोलले जात होते.
मनसेने लोकसभेच्या २ किंवा ३ जागा मागितल्याची चर्चाही सुरु आहे. तसेच अमित शाह यांच्याबरोबरच्या भेटीत नेमके काय ठरले? मनसे महायुतीत जाणार की नाही? अशा अनेक मुद्यांवर आज राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.
मनसेने प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये काय? मनसेचा गुढी पाडवा मेळावा मुंबईत आज होत आहे. या मेळाव्याचा टीझर मनसेकडून दोन-तीन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ असून त्यामध्ये ते असे म्हणत आहेत की, “गेल्या काही आठवड्यापासून आपल्या पक्षाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
याकडे मी शांतपणे पाहत आहे. तुम्हालादेखील अनेकांनी प्रश्न विचारुन भंडावून सोडले असेल. या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतेय, घडवले जातेय, हे सांगण्याची वेळ आली. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या, आपल्याशी बोलायचे आहे”, असे या टीझरमध्ये म्हटले आहे.